कळंबा जेलमध्ये जिवंत काडतूस; पुण्यातील दोन कैद्यांविरुद्ध गुन्हा
कोल्हापूर : कळंबा कारागृहातील सर्कल 7 पूर्वेकडील चार नंबरच्या स्वच्छतागृहात पिस्तुलाचे जिवंत काडतूस सापडले. याप्रकरणी पुणे येथे ‘मोका’अंतर्गत कारवाई झालेले कैदी सुरेश बळीराम दयाळू आणि आमीर ऊर्फ चंक्या असिर खान यांच्याविरुद्ध जुना राजवाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. जेलमध्ये काडतूस सापडल्याने कैद्यांकडे पिस्तूल असावे, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
जुना राजवाडा पोलिसांनी कारागृहातील सर्वच बरॅकसह कैद्यांची तपासणी सुरू केली आहे. शनिवारी (दि. 1) काडतूस सापडल्यानंतर दोन दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे कळंबा कारागृह प्रशासनामध्ये खळबळ माजली आहे.
कारागृह सुभेदार उमेश चव्हाण (रा. कळंबा) सहकार्यांसह शनिवारी दुपारी कारागृहातील सर्कल सातची झडती घेत होते. त्यावेळी त्यांना स्वच्छतागृहाजवळ प्लास्टिक पिशवीत जिवंत काडतूस आढळून आले. अधिकार्यांनी केलेल्या चौकशीत काडतूस ‘मोका’अंतर्गत कारवाई झालेल्या पुण्यातील सुरेश दयाळू आणि आमीर ऊर्फ चंक्या खान यांनी लपविल्याची माहिती मिळाली. हे दोन्ही कैदी पुणे जिल्ह्यातील आहेत.
लवकरच उलगडा होईल
सुभेदार चव्हाण यांनी सोमवारी राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक संजीव झाडे यांनी पाच ते सहा तास कारागृहाची झडती घेतली. काही कैद्यांकडे चौकशी केली. मात्र, कारागृहात काडतूस कसे आले? ते कोणी आणले? कधी आणले? याचा उलगडा अद्याप झालेला नाही. लवकरच या प्रकरणाचा उलगडा होईल, असे झाडे यांनी सांगितले.


















